शहर आणि गावातली दरी दूर करुन आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानाने मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वित्त आणि तंत्रज्ञान विषयक ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करत होते. गेल्या १० वर्षांत ३१ अब्ज डॉलरची गुंतवणूक फिनटेकमध्ये झाली असून फिनटेक स्टार्टअप्समध्ये ५०० टक्के वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. बँक व्यवहारांचं संगणकीकरण झालं, गेल्या १० वर्षात ५३ कोटी जनधन खाती उघडली गेली त्यात २९ कोटींपेक्षा जास्त खाती महिलांची आहेत, असं सांगून ते म्हणाले की, फिनटेकमुळे महिला सक्षमीकरणालाही हातभार लागला आहे. थेट लाभ हस्तांतरण होत असल्यानं भ्रष्टाचाराला जागी राहिली नाही, असं मोदी यांनी सांगितलं.
भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक क्रिश गोपालकृष्णन यांचीही भाषणं यावेळी झाली.