केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया या महत्वाच्या अभियानाला दहा वर्ष पूर्ण होत असल्याचं स्मरणही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बात मध्ये केलं. या अभियानानं गरीब, मध्यमवर्ग तसंच सूक्ष्म, लघु, आणि मध्यम उद्योग क्षेत्राला मोठा लाभ झाला. या अभियानानं प्रत्येक घटकाला आपली प्रतिभा जगासमोर आणायची संधी दिली असं ते म्हणाले. या अभियानामुळे आज भारत उत्पादनाचं केंद्र बनला आहे, प्रत्येक क्षेत्रातली निर्यात वाढली आहे आहे असं त्यांनी सांगितलं. परकीय गुंतवणुकीचं वाढतं प्रमाण हे या अभियानाची यशोगाथा सांगतं असं ते म्हणाले.
महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यातल्या पारंपरिक रेशीम उद्योगाचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला.
भंडारा टसर सिल्क हॅण्डलूम. नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उद्योगात भंडारा जिल्ह्यातले ५० पेक्षा जास्त स्वयंसहायता गट कार्यरत आहेत. या कामात महिलांचा सर्वाधिक सहभाग आहे. या रेशीम उत्पादनाला लोकप्रियता मिळत असून स्थानिक समुदायही सक्षम होतो असल्याचं सांगून, हाच मेक इन इंडियाचा गाभा असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले.
स्वच्छताही सेवा या उपक्रमाअंतर्गत देशभरात सुरु असलेल्या अभिनव स्वच्छता मोहिमा आणि कचऱ्याच्या पुनर्वापराबद्दलही प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांना सांगितलं. येत्या २ ऑक्टोबरला स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीलाही १० वर्षं पूर्ण होत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. या अभियानाला लोक चळवळीचं रूप देणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले. हे अभियान म्हणजे या उद्देशासाठी आपलं जीवन समर्पित केलेल्या महात्मा गांधीजींना खरी श्रद्धांजली आहे असं ते म्हणाले. स्वच्छता मोहिम नैमित्तिक नाहीत तर ते निरंतर चालणारं काम आहे, असं त्यांनी सांगितलं.यावेळी प्रधानमंत्र्यांनी एक पेड माँ के नाम या अभियानाला मिळत असलेल्या यशाची, या अभियानाअंतर्गत देशभरात कोटींच्या संख्येनं सुरू असलेल्या रोप लागवडीची तसंच, वृक्ष संवर्धनांच्या कल्पक उपक्रमांची माहिती श्रोत्यांना दिली. देशभरात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसाचा संदर्भ देत त्यांनी सरकाच्या कॅच द रेन या संकल्पेनाचा उल्लेख केला आणि पुन्हा एकदा मन की बात मधून जलसंवर्धानाचं महत्व श्रोत्यांसमोर मांडलं. यानिमित्तानं त्यांनी महिलांनी राबवलेल्या अनोख्या नदी संवर्धन आणि जलसंवर्धन उपक्रमांची तसंच पाणी टंचाई दूर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती श्रोत्यांना दिली.
आपल्या अलिकडच्या अमेरिका दौऱ्यात अमेरिका सरकारनं भारताला सुमारे 300 प्राचीन कलाकृती परत केल्याची, आणि त्यातल्या कलाकृतींची तपशीलवार माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. मात्र अशा कलाकृती अवैध मार्गांनी देशाबाहेर नेणं हा गंभीर गुन्हा आणि आपला वारसा संपवण्यासारखी कृती आहे असं ते म्हणाले. देशातल्या नागरिकांची प्रतिभा आणि सृजनशक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सुरू केलेल्या Create in India या उपक्रमाची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. याअंतर्गत आखलेल्या २५ आव्हानांमध्ये सहभागी व्हावं, आणि आपली सर्जनशीलता जगासमोर आणावी, यासाठी वेव्ह्स इंडिया डॉट ओआरजी(wavesindia.org) या संकेतस्थळाला भेट द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं.
आगामी सणांनिमित्त शुभेच्छा देतानाच केवळ मेड इन इंडियाच उत्पादनांची खरेदी करण्याच्या जुन्या संकल्पाची उजळणी करावी, असं आवाहन त्यांनी केलं.
देशवासियांना नागरिकांना सकारात्मक माहितीची ओढ आहे हे मन की बात या कार्यक्रमानं सिध्द करून दाखवलं असं प्रधानमंत्री म्हणाले. या कार्यक्रमाचा हा ११४ वा भाग होता. मन की बात साठी देशाच्या कानाकोपऱ्यातील कोट्यवधी श्रोत्यांनी माहिती उपलब्ध करून दिली, हे श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत अशा शब्दांत त्यांनी श्रोत्यांची प्रशंसा केली.
आपल्यासाठी मन की बातची संपूर्ण प्रक्रिया ही आपल्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेतल्यासारखीच होती अशी उत्कट भावना त्यांनी व्यक्त केली. मन की बातच्या प्रसारणाची धुरा सांभाळणाऱ्या आकाशवाणी, दूरदर्शनसह, हा कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या आणि त्यावर विविध कार्यक्रम रचणाऱ्या इतर दूरचित्रवाहिन्या आणि युट्युबर्सचेही यावेळी प्रधानमंत्र्यांनी आभार मानले.