देशभरात आज शिक्षक दिवस साजरा होत असून यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दरवर्षी ५ सप्टेंबर हा माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय शिक्षण क्षेत्राचा दर्जा उंचावण्याबरोबर विद्यार्थ्यांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी योगदान दिलेल्या ८२ शिक्षकांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार दिले जाणार आहेत. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळालेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे. या पुरस्काराचं स्वरूप ५० हजार रुपये रोख, रौप्य पदक आणि प्रशस्तीपत्र असं आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोवळ्या मनाला घडवणाऱ्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासाबरोबर त्यांना सुजाण आणि जबाबदार नागरिक म्ह्णून घडवण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांनी शिक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक शिक्षण पद्धतीची योग्य सांगड घालून भारत जगभरात ज्ञानाचं उत्कृष्ट केंद्र म्हणून उदयास येत आहे, असं ते म्हणाले.