राज्यसभेत विरोधकांनी नीट परीक्षा गैरप्रकार प्रकरणी केलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काल, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त सत्राला उद्देशून केलेल्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली. या चर्चेसाठी 21 तास राखून ठेवण्यात आले आहेत. कालच्या चर्चेदरम्यान भारतीय जनता पार्टीनं कॉंग्रेसवर टीका केली. कॉंग्रेस पक्ष सत्तेवर असतो, तेव्हा तेव्हा राज्यघटना धोक्यात असते असा आरोप करण्यात आला. राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत बदलांसह अनेक उदाहरणं देण्यात आली.
दरम्यान, लोकसभेत विरोधक नीट मुद्द्यावर चर्चेसाठी ठाम असल्यानं झालेल्या गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. काल कामकाज सुरू झाल्यावर लगेचच विरोधकांनी इतर सर्व कामकाज रद्द करून नीटबाबत चर्चेसाठी स्थगन प्रस्ताव मांडला. अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी, राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्तावाच्या दरम्यान स्थगन प्रस्तावाला परवानगी देता येत नाही असं स्पष्ट केलं.
विरोधी सदस्यांनी घोषणा सुरूच ठेवल्या, तेव्हा अध्यक्षांनी सदस्यांना लोकांनी लोकसभेत गोंधळ घालण्यासाठी नव्हे तर चर्चेसाठी पाठवलं आहे, असं सुनावलं. मात्र, गोंधळ कायम असल्यानं अध्यक्षांनी कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं.