लोकशाहीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध केंद्रीय संस्थांनी राज्यांमध्ये समन्वयानं काम करणं गरजेचं असून, घटनात्मक प्रमुख या नात्यानं राज्यपालांनी ही प्रक्रिया सुलभ करायला हवी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनामध्ये आयोजित राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या.
या परिषदेत केंद्र-राज्य संबंधांसह सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाशी निगडित विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
राज्यपालांनी पदग्रहण करताना घेतलेल्या प्रतिज्ञेचा संदर्भ देत, त्यांनी गेल्या दशकभरात समाजाच्या कल्याणासाठी राबवल्या गेलेल्या योजना आणि देशाने साधलेला विकास, याबाबत लोकांमध्ये जाणीव निर्माण करण्याची घटनात्मक जबाबदारी पार पाडावी, असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी परिषदेला संबोधित करताना सांगितलं.
राज्यपालांनी केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय साधावा आणि जनतेशी तसंच सामाजिक संस्थांशी संवाद साधून वंचितांना सहकार्य करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या परिषदेला संबोधित करताना केलं.
या परिषदेत केंद्रीय मंत्री, नीती आयोगाचे उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी देखील सहभागी झाले आहेत.