पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदकं जिंकल्याबद्दल शरद कुमार, मरियप्पन थंगावेलू, अजित सिंग आणि सुंदर सिंग या खेळाडूंचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंची कामगिरी ही शाश्वत उत्कृष्टतेची उदाहरणे असून त्यांचं यश उच्च आंतरराष्ट्रीय दर्जा गाठण्याची आकांक्षा असलेल्या खेळाडूंना प्रेरणा देईल, असं राष्ट्रपती मुर्मू यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती धनखड यांनी या खेळाडूंचं अभिनंदन करताना भारताला या खेळाडूंचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. मरियप्पन थंगावेलूचं अभिनंदन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, पॅरालिम्पिकमध्ये सलग तीन वेळा त्याने पदके जिंकली, हे कौतुकास्पद असून त्याचं कौशल्य, सातत्य आणि दृढनिश्चय अपवादात्मक आहे. तर शरद कुमार याचं सातत्य संपूर्ण देशाला प्रेरणा देणारं असून, सुंदरसिंग गुर्जर यांनी पॅरालिम्पिकमध्ये केलेली ही अभूतपूर्व कामगिरी होती, असंही प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे.
Site Admin | September 4, 2024 1:17 PM | #ParisOlympics #IndiaAtParis #Paris2024 | Draupadi Murmu | Jagdeep Dhankhad | narendra modi