स्वामी विवेकानंद यांची आज १६३वी जयंती. अध्यात्मिक गुरु, तत्वज्ञ-विचारवंत आणि भारतीय संस्कृतीचे प्रणेते असलेल्या विवेकानंदांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरी केली जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. स्वामी विवेकानंद यांनी भारताचा संदेश पाश्चात्य जगापर्यंत पोहोचवला आणि देशवासियांच्या मनात आत्मविश्वास पेरला असं राष्ट्रपती म्हणाल्या. देशाची उभारणी करण्यासाठी, मानवतेची सेवा करण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी तरुणांना प्रेरित केलं, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. त्यांचा वारसा अखंड सुरू ठेवण्यासाठी राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. विवेकानंद हे तरुणांसाठी चिरंतन प्रेरणा आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले. तर त्यांची कालातीत शिकवण देशाची उभारणी करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर म्हणाले.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबईत राजभवन इथं स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहिली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना आदरांजली वाहिली.