राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम यांचं आज राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक स्वागत केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. दोन्ही देश डिजीटल तंत्रज्ञान क्षेत्रात नव्या वाटेवर वाटचाल करत आहेत. गुजरातची गिफ्ट सिटी आणि सिंगापूर दरम्यान अपांरपरिक ऊर्जा निर्मितीचा कॉरिडॉर सुरु होणार असून दोन्ही देश व्यापक परस्पर सहकार्य धोरण, सेमीकंडक्टर निर्मितीत सहकार्य त्याचप्रमाणे उत्पादन आणि औद्योगिक पार्कच्या निर्मितीत एकत्र येतील, असं सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षण्मुगरत्नम प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
भारत १९६५ साली स्वतंत्र सिंगापूरला पाठिंबा देणाऱ्या देशांमध्ये होता याचं स्मरणही त्यांनी यावेळी केलं. षण्मुगरत्नम पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत मंत्री, संसद सदस्य आणि अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे. सिंगापूरचे अध्यक्ष म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. अध्यक्ष षण्मुगरत्नम शुक्रवार आणि शनिवारी ओदिशालाही भेट देतील. त्यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांना आणखी गती मिळेल अशी अपेक्षा आहे.
Site Admin | January 16, 2025 1:51 PM | President of Singapore Tharman Shanmugaratnam | Rashtrapati Bhavan