आज मानवी हक्क दिन आहे. तत्कालीन संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 1948 मध्ये मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्याच्या घटनेनिमित्त दर वर्षी दहा डिसेंबरला हा दिन साजरा करण्यात येतो. आपले हक्क, आपलं भविष्य, या क्षणी असं यंदाच्या मानवी हक्क दिनाचं ब्रीदवाक्य आहे. या दिनानिमित्त राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करणार आहेत. उद्घाटनानंतर मानसिक आरोग्याबाबत राष्ट्रीय परिषद होणार असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती बी. आर. गवई यांनी देशात या वर्षी राष्ट्रीय लोक अदालतींमध्ये सात कोटी सत्तर लाख प्रकरणं निकाली काढली गेल्याचं म्हटलं आहे. मानवी हक्क दिनानिमित्त आकाशवाणीशी ते बोलत होते. देशात दर वर्षी तीन वेळा राष्ट्रीय लोक अदालती आयोजित केल्या जातात आणि अनेक वर्षांपासून थकीत असलेली प्रकरणं परस्पर सहमतीनं निकाली काढली जातात, अशी माहिती त्यांनी दिली.