राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना 36 शौर्य पुरस्कार प्रदान केले. काल संध्याकाळी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आलेल्या शौर्य पुरस्कारांमध्ये 10 कीर्ती चक्र आणि 26 शौर्य चक्रांचा समावेश आहे. यापैकी 7 जवानांना मरणोत्तर कीर्ती चक्र आणि 7 जवानांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात आली. अतुलनीय शौर्य, दुर्दम्य साहस आणि कर्तव्याप्रती निष्ठा दाखविणाऱ्या जवानांना हे पुरस्कार देण्यात आले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाला आपल्या शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि समर्पणाचा अभिमान आहे असं पंतप्रधानांनी आपल्या समाज माध्यमातील संदेशात म्हटलं आहे. आपले जवान सेवा आणि त्यागाच्या सर्वोच्च आदर्शाचं उदाहरण देतात. त्यांचं धैर्य देशवासीयांना नेहमीच प्रेरणा देत राहील, असं मोदी यांच्या संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपती भवनात संरक्षण अलंकरण समारंभामध्येही उपस्थित होते.