न्यायाधारित विकसित भारत घडवण्यासाठी न्यायवैद्यक शास्त्राची महत्त्वाची भूमिका असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. गुजरातमध्ये गांधीनगर इथे राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाला त्या संबोधित करत होत्या. यावेळी त्यांनी सर्वांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून विकसित भारताच्या संकल्पनेला अधोरेखित केलं.
गुन्ह्यांच्या बदलत्या स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर न्यायवैद्यक शास्त्राचं महत्त्वं वाढत असल्याचंही त्या म्हणाल्या. न्यायवैद्यकीय तज्ञांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि न्यायप्रक्रियेत त्यांच्या निर्णायक सहभागासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल राष्ट्रपतींनी विद्यापीठाचं कौतुक केलं. तसंच, या क्षेत्रात महिला पदवीधरांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. या समारंभात दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली.