राष्ट्रपतींनी आज पुण्यात सिम्बायोसिस विद्यापीठाच्या एकविसाव्या दीक्षांत समारंभाला संबोधित केलं. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थीनींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करायला हवं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. देशाच्या विकासात महिलांचा अविभाज्य वाटा असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.
दीक्षांत समारंभात सुवर्णपदक विजेत्या ११ जणांमध्ये ८ विद्यार्थिनी आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. लैंगिक समानतेवर भर देऊन सर्वसमावेशक विकासासाठी विद्यापीठ करत असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी प्रशंसा केली.
मूल्याधारित शिक्षण देणं आणि विद्यार्थ्यांना समाजाची संस्कृती आणि गरजा समजावून सांगणं हे शैक्षणिक संस्थांचं ध्येय असायला हवं, असं त्या म्हणाल्या. समाजातल्या वंचित घटकांचा विचार करून, आरोग्य सेवा उत्पादनं विकसित करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.