राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजी, न्यूझीलंड आणि पूर्व तिमोर या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या आज फिजी मध्ये नाडी इथं पोहचल्या आहेत. त्या बुधवार पर्यंत फिजीमध्ये असतील. फिजीचे उपप्रधानमंत्री विलियम गावोका आणि फिजीमधले भारताचे उच्चायुक्त पी एस. कार्तिकेयन यांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फिजीचे राष्ट्राध्यक्ष काटोनिवेरे आणि प्रधानमंत्री सिटिव्हनी राबुका यांच्यासोबत बैठक घेणार आहेत. त्या फिजीच्या संसदेला संबोधित करणार असून नंतर फिजीमधल्या भारतीयांशी देखील संवाद साधणार आहेत. तसंच राष्ट्रपती सुवा इथल्या गांधी मेमोरियल कॉलेज आणि नाडीमधल्या श्री शिव सुब्रमण्यम स्वामी मंदिरालाही भेट देणार आहेत. यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती ८ आणि ९ ऑगस्ट रोजी न्यूझीलंडमध्ये असतील.
दौऱ्यादरम्यान त्या न्यूझीलंडच्या गव्हर्नर जनरल सिंडी किरो यांच्यासोबत बैठक घेणार असून त्या प्रधानमंत्री क्रिस्टोफर लक्सन यांचीही भेट घेणार आहेत. त्या वेलिंग्टन इथं आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला संबोधित करतील आणि ऑकलंडमधल्या भारतीयांशी संवाद साधतील. यात्रेच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रपती १० ऑगस्टला पूर्व तिमोरला जातील. राष्ट्रपती पूर्व तिमोरचे राष्ट्राध्यक्ष जोस रामोस होर्टा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतील. राष्ट्रपती पूर्व तिमोरचे प्रधानमंत्री के राला शनाना गुस्माओ यांचीही भेट घेणार आहेत.