न्यायव्यवस्थेनं शिक्षेपेक्षा न्याय देण्यावर भर द्यावा, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. भुवनेश्वर इथं नवीन न्यायालय संकुलाचं उद्घाटन काल राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. गरिबांना अनावश्यक त्रासदायक ठरणारी, न्यायापासून वंचित ठेवणारी आणि खटले सातत्यानं पुढे ढकलण्याची ही व्यवस्था आता बदलायला हवी, असं आवाहन त्यांनी कायदेतज्ज्ञांना केलं. भारतीय न्याय संहितेनं देशातील वसाहतवादी न्यायव्यवस्था संपुष्टात आणली असून त्यामुळे भारतीय दंड संहितेचा अंत झाला आहे. जनतेला पोलीस आणि न्यायालयांविषयी निर्भय बनवणं हा यामागचा मुख्य उद्देश आहे, असं त्या म्हणाल्या. सर्वसामान्यांच्या हितासाठी न्यायालयीन आदेश स्थानिक भाषांमध्ये देण्याचे आणि प्रसिद्ध करण्याचं आवाहनही राष्ट्रपतींनी केलं.
Site Admin | December 6, 2024 2:55 PM | President Draupadi Murmu