भारतीय सुरक्षा दलांवर केवळ देशाच्या सुरक्षेची जबाबदारी नसून सायबर युद्ध आणि दहशद वाद यासारखी नवी आव्हाने देखील असून त्यांना तोंड देण्यासाठी सक्षम होणं आवश्यक आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केल. तामिळनाडूतल्या वेलिंगटन इथल्या संरक्षण सेवा प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी अधिकारी आणि शिक्षकांना संबोधित करताना त्या बोलत होत्या. आजच्या जगात वेगाने बदलणाऱ्या भू-राजनैतिक वातावरणात सर्व प्रकारच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपण तयार असले पाहिजे असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.
राष्ट्रपती मुर्मू बुधवारपासून तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर असून आज त्या उधग मंडलम् अर्थात उटी इथल्या राजभवनात आदिवासी भागातील बचत गटाच्या महिला प्रतिनिधींना आणि निलगिरी जिल्ह्यातल्या आदिवासी समुदायाच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत. उद्या तिरूवरूर इथल्या तामिळनाडू केंद्रीय विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत .