राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पर्यावरणप्रति जागरूक आणि संवेदनशील जीवनशैली अंगिकारण्यावर भर दिला आहे. जेणेकरून आपलं जीवन केवळ सुरक्षितच नव्हे, तर चैतन्यमय देखील होईल असं त्यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषद २०२५ च्या उदघाटन समारंभात बोलत होत्या. जागरूकता आणि एकत्रित प्रयत्नांच्या आधारावर केलेल्या कृतीमधूनच पर्यावरणाचं रक्षण आणि त्याचा प्रचार शक्य होईल, असं त्या यावेळी म्हणाल्या. येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ पर्यावरण उपलब्ध करणं, ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचं त्या म्हणाल्या. भारताची विकासाची परंपरा शोषणावर नव्हे, तर संरक्षणावर आधारित असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारत कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या नवोन्मेषला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करत असून, विकसनशील देश जलद विकासाद्वारे हवामान बदलाची समस्या अधिक सक्षमपणे हाताळू शकतील असं केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी सांगितलं. भारत केवळ कार्बन फूटप्रिंट कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत नसून, हरित ऊर्जा क्षेत्राच्या माध्यमातून लाखो रोजगार निर्माण करण्यावरही लक्ष केंद्रित करत आहे, असं ते म्हणाले.
या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायमूर्ती विक्रम नाथ उपस्थित होते. सरकारी धोरणं हरित तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणारी असावीत आणि उद्योगांनी पर्यावरणावर पडणाऱ्या आपल्या प्रभावाची जाणीव ठेवावी, असं ते म्हणाले.
पर्यावरण रक्षण आणि शाश्वततेचं सामूहिक उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी सहकार्याला चालना देणं आणि जागरूकता वाढवणं हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे.
PRESIDENT-NGT CONFERENCE