प्रयागराज जिल्ह्यात कार आणि बसची जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण १९ जण जखमी झाले आहेत. छत्तीसगड राज्यातल्या कोरबा इथून प्रयागराज कडे जाणारी गाडी प्रयागराजहून वाराणसीकडे जाणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाल्याचं प्रयागराजचे पोलीस आयुक्त तरुण गाबा यांनी सांगितलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अपघातात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी सदिच्छा समाज माध्यमांवर व्यक्त केली आहे. तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी झालेल्या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.