रस्ते वाहतूक, रेल्वे, तसंच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरचा वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित करण्याची गरज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करणं गरजेचं आहे. मुंबई महानगर क्षेत्रात `‘केबल कार’ प्रकल्प राबवण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी, अथवा केंद्र आणि राज्य शासनाच्या आर्थिक भागिदारीनं रोप वे विकसित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
उद्या नवी दिल्ली इथं होणाऱ्या ‘विकसित भारत २०४७’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या लक्ष्य प्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या, सर्व राज्यांच्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीला सरनाईक उपस्थित राहणार आहेत. यावेळी गडकरी यांची भेट घेऊन यासंदर्भातला विकास आराखडा तयार करुन तत्वत: मान्यता घेण्याचा प्रयत्न राहील, असं त्यांनी सांगितलं.