प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते नवी दिल्लीत समारंभपूर्वक वितरण करण्यात आलं. कला तसंच संस्कृती, धाडस, नवोन्मेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, क्रीडा आणि पर्यावरण अशा विविध सात श्रेणींमध्ये १७ बालकांना असाधारण कामगिरीसाठी हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात मुंबईची १३ वर्षीय केया हटकर आणि अमरावतीच्या १७ वर्षीय करिना थापा हिचा समावेश आहे. केया हटकर, डान्सिंग ऑन माय व्हील्स आणि आय एम पॉसिबल या दोन बेस्टसेलर पुस्तकांची लेखिका आहे. तिला कला आणि संस्कृती क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आलं. करिना थापाला तिच्या धाडसाबद्दल राष्ट्रीय बाल पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तिनं अतुलनीय प्रसंगावधान दाखवत आगीतून गॅस सिलेंडर बाहेर काढून तब्बल ३६ जणांचे प्राण वाचवले होते. या बालकांचे साहस अद्वितीय असून भारतीयांसाठी प्रेरणादायी असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
शीख धर्मियांचे दहावे गुरू, गुरू गोविंदसिंह यांचे दोन पुत्र, बाबा जोरावरसिंह आणि बाबा फतेहसिंह यांच्या बलिदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.