आत्मनिर्भर भारत संकल्पनेवर काम केल्यामुळे देशात विकास कामांना चालना मिळाली. गेल्या दहा वर्षांत देशात सातत्यानं झालेल्या सुधारणा, आर्थिक शिस्त, कामांत आलेल्या पारदर्शकतेमुळे उद्योग क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. अर्थसंकल्पानंतर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर आयोजित वेबिनारमध्ये प्रधानमंत्री बोलत होते. देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार काम करत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं.
देशाच्या आर्थिक विकासात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अर्थात MSME क्षेत्राचं महत्त्व प्रधानमंत्र्यांनी भाषणातून अधोरेखित केलं.देशात उद्योग क्षेत्रात सुलभता आणण्यासाठी केंद्र सरकारने विविध उपाययोजना आखल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. उद्योग क्षेत्रात सातत्यानं केलेल्या सुधारणांमुळे उद्योग विश्वासात नवीन विश्वास निर्माण झाला. यामुळेच कोरोना महामारीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेवर फार परिणाम झाला नाही. उलट यानंतर भारतीय अर्थव्यवस्था गतीमान झाली. जागतिक पातळीवर अनेक देशांना भारताबरोबर आर्थिक संबंध अधिक दृढ करायचे असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
प्रथमच उद्योग सुरू करणाऱ्या महिला तसंच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमधल्या पाच लाख व्यावसायिकांना दोन कोटी रुपये कर्ज मिळेल अशी घोषणा त्यांनी केली. तसंच निर्मिती आणि निर्यात प्रोत्साहनासाठी दोन नवीन मोहिमा सुरू करणार असल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी जाहीर केलं. उद्योजकांनी दर्शक न राहता त्यांनी जागतिक पातळीवर ज्या वस्तूंना अधिक मागणी आहे, त्याचं उत्पादन करत त्यांच्या निर्यातीवर लक्ष केंद्रीत करण्याचं आवाहन त्यांनी केलं. उत्पादनाशी संबंधित प्रोत्साहन योजनांमुळे १३ लाख कोटी रुपयांचं उत्पादन झालं असून १ लाख ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.