विधानसभेसाठी महाराष्ट्रात सगळ्याच राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन एकजुट होऊन हिंदूंनी राष्ट्रविरोधी शक्तीच्या विरोधात लढा द्यावा असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल वाशिम इथं जाहीर सभेत केलं. महाविकास आघाडीद्वारे लोकसेवेची पंचसुत्री काल मुंबईत वांद्रे इथं झालेल्या संयुक्त जाहीर सभेत प्रकाशित करण्यात आली.
शेतकऱ्यांचे 3 लाखापर्यंतचं कर्जमाफ, महिलांना 3000 रुपये महिना आणि मोफत बसप्रवास, बेरोजगारांना 4 हजार रुपये महिना भत्ता, कुटुंबाला 25 लाखांचा आरोग्य विमा अशी वचनं यामध्ये देण्यात आली आहेत. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, यांच्यासह महाविकास आघाडीचे राज्यातले प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. राज्यघटना हे केवळ पुस्तक नसून जीवनपद्धती आणि तत्त्वज्ञान असल्याचं राहुल गांधी यांनी नागपुरात आयोजित संविधान सन्मान परिषदेत बोलताना सांगितलं.