डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मुंबई आणि ठाण्याला भविष्याच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी महायुतीला साथ देण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

मुंबई आणि ठाण्याला भविष्याच्या दृष्टीनं तयार करण्यासाठी महायुतीला साथ देण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ठाण्यात पायाभूत सुविधांच्या ३२ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध कामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण केल्यावर ते बोलत होते. यात बीकेसी ते आरे दरम्यानच्या मेट्रो ३ चं उद्घाटन, ठाणे वर्तुळाकार मेट्रो आणि मुंबईत घाटकोपर जवळच्या छेडा नगरपासून ठाण्यातल्या आनंद नगरपर्यंतच्या पूर्वमुक्त महामार्गाच्या विस्तारीत भागाची पायाभरणी यांचा समावेश आहे. याशिवाय  ‘नैना’ अर्थात नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्रातल्या विकासकामांचा पहिला टप्पा, ठाणे महापालिकेच्या नव्या इमारतीचं भूमीपूजन प्रधानमंत्र्यांनी केलं. 

 

हे प्रकल्प मुंबई आणि ठाण्याला नवीन ओळख देतील. आमच्या सरकारचे सर्व निर्णय, संकल्प आणि स्वप्न विकसित भारतासाठी असतात, असं त्यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्र सोडलं. 

 

महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत आली तर महायुती सरकारच्या योजना बंद करेल. त्यांच्या कार्यकाळात सरकारी पैसा महिलांच्या नव्हे तर दलालांच्या हाती जाईल, असा दावा प्रधानमंत्र्यांनी केला. मुंबई महानगर क्षेत्रातल्या विकासकामांमध्ये महाविकास आघाडीनं अडथळे आणले. यामुळं मुंबई मेट्रो ३ प्रकल्पाची किंमत १४ हजार कोटी रुपयांनी वाढली. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. विकास कामं थांबवणाऱ्यांना सत्तेत येण्यापासून रोखा. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं स्वप्न पूर्ण होऊ देऊ नका आणि इतिहासातून धडा घेऊन एकजूट कायम ठेवा, असं आवाहन प्रधानमंत्री मोदी यांनी नागरिकांना केलं. 

 

भाषणाच्या सुरुवातीला प्रधानमंत्र्यांनी राज्यातली साडेतीन शक्तीपीठं, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन केलं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणं हा महान परंपरेचा सन्मान असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. 

 

विकास आणि विश्वास ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दोन रुपं आहेत. स्वातंत्र्यानंतरचा मुंबईचा सर्वाधिक विकास सध्या सुरू असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून वेळेत काम पूर्ण करण्याचं लक्ष समोर ठेवून सरकार काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडी सरकारनं या मेट्रोसह मुंबई महानगर क्षेत्रातली अनेक कामं थांबवली असा आरोप त्यांनी केला.  

 

मेट्रो ३ च्या कामात मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अडथळे आणले असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केला. राहुल गांधी यांनी आज कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. याचा संदर्भ देत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुस्तकातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेख प्रकरणी माफीची मागणी फडनवीस यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नव्या मेट्रोतून प्रवास केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी, विद्यार्थी आणि कामगार यांच्याशी संवाद साधला. सर्वसामान्य नागरिकांसाठी सोमवारी पहाटेपासून ही मेट्रो सुरू होणार आहे. याशिवाय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा