प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला दोन दिवसांचा अमेरिका दौरा आटपून आज मायदेशी परत यायला निघाले. याआधी ते फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते. आपल्या अमेरिकेच्या दौऱ्यात त्यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासह तिथल्या अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर भारताबरोबरची ही पहिलीच द्विपक्षीय चर्चा होती.
प्रधानमंत्री मोदी यांच्या अमेरिका भेटीत दोन्ही देशांमध्ये व्यापार, उद्योग, संरक्षण आणि सुरक्षा, ऊर्जा, तसंच दोन्ही देशांच्या नागरिकांमधल्या परस्पर संबंधांसह विविध मुद्द्यांवर उच्च स्तरीय द्विपक्षीय चर्चा झाली. भारत-मध्यपूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर वर एकत्रितपणे काम करण्यावर दोन्ही देशांमध्ये यावेळी सहमती झाली.
प्रधानमंत्री मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात काल व्हाईट हाऊस मध्ये झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं.
यावेळी दोन्ही देशांमध्ये १६ वर्षांपूर्वी झालेल्या ऐतिहासिक नागरी अनु करारा अंतर्गत, भारतात अमेरिकी डिझाईनच्या आण्विक भट्ट्यांची निर्मिती करण्याच्या दिशेने पुढे जाण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली.
मुंबई दहशतवादी हल्ल्यासारख्या कारवाया रोखण्यासाठी अल-कायदा, आयसिस (ISIS), जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तय्यबा यासारख्या दहशतवादी गटांविरोधात सहकार्य मजबूत करण्यासाठी वचनबद्ध राहण्याचा दोन्ही नेत्यांनी यावेळी संकल्प केला.
देशाच्या नागरिकांचं नुकसान करणाऱ्यांना शासन करण्याची सामायिक गरज लक्षात घेता, मुंबई हल्ल्यांमधला आरोपी, तहव्वुर राणाचं भारताला प्रत्यार्पण करायला अमेरिकेनं मंजुरी दिली. पाकिस्ताननं आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन दोन्ही नेत्यांनी केलं.