विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याच्या महत्त्वावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भर दिला आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारानं सन्मानित शिक्षकांसोबत काल नवी दिल्लीत आपल्या निवासस्थानी संवाद साधताना मोदी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या परिणामांवर चर्चा केली. शिक्षक विद्यार्थ्यांना स्थानिक लोककथा वेगवेगळ्या भाषांमध्ये शिकवू शकतात, जेणेकरून विद्यार्थी अनेक भाषा शिकू शकतील आणि भारताच्या सतत बदलत्या संस्कृतीचा परिचय देखील करू शकतील असं त्यांनी सुचवलं.
प्रधानमंत्री म्हणाले की, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना भारतातील विविधतेचा शोध घेण्यासाठी शैक्षणिक दौऱ्यावर घेऊन जाऊ शकतात, यामुळे त्यांच्या शिकण्यात आणि त्यांना आपल्या देशाबद्दल सर्वांगीण माहिती मिळण्यास मदत होईल. पर्यटनाला तसंच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही यातून चालना मिळेल, असंही मोदी म्हणाले.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी समाज माध्यमातून एकमेकांशी संपर्क राखावा आणि आपल्या सर्वोत्तम अध्ययन पद्धतींची देवाण घेवाण केली तर प्रत्येकाला अशा पद्धती शिकता येतील, जुळवून घेता येतील आणि त्यांचा लाभ होईल.
पुरस्कार विजेत्या शिक्षकांनी अध्यापनाचे अनुभव पंतप्रधानांना सांगितले. शिकवण्याची प्रक्रिया अधिक मनोरंजक बनविण्यासाठी वापरलेल्या तंत्रांची माहिती त्यांनी दिली. नियमित अध्यापन कार्यासोबतच त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची उदाहरणंही त्यांनी सांगितली.
Site Admin | September 7, 2024 10:25 AM | Prime Minister Narendra Modi