तीन देशांच्या दौऱ्यामधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नायजेरियामधे पोहचले असून तिथल्या भारतीय समुदायाने त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. मोदी यांनी भारतीय समुदायाशी संवाद साधला.नायजेरियात राहणाऱ्या मराठी भाषक समुदायानं आपल्या मुळांशी आणि मातीशी नातं जपलं असल्याबद्दल मोदी यांनी या समुदायाचं कौतुक केलं. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी समुदायाने आनंद व्यक्त केल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद तिनुबू यांच्याशी ते आज चर्चा करतील. या बैठकीत दोन्ही देशांदरम्यानच्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेण्यात येईल आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्या बाबत चर्चा होईल. या चर्चेनंतर अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. दि ग्रँड कमांडर ऑफ ऑर्डर ऑफ दि नायजर हा नायजोरियातला सर्वोच्च सन्मान प्रधानमंत्री मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. इतर देशांकडून मोदी यांना मिळणारा हा १७वा सन्मान आहे. नायजेरियानंतर प्रधानमंत्री ब्राझिल आणि गयाना देशांना भेट देणार आहेत.
Site Admin | November 17, 2024 3:10 PM | Prime Minister Narendra Modi