प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पोलंड आणि युक्रेनच्या तीन दिवसीय दौऱ्यावर असतील. नवी दिल्लीत काल झालेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव तन्मय लाल यांनी ही माहिती दिली. ४५ वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री पोलंडला भेट देणार असल्यानं हा दौरा महत्त्वाचा असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क यांच्याशी संवाद साधतील, तसंच राष्ट्राध्यक्ष आंद्रे डुडा यांच्याशीही चर्चा करतील. त्यानंतर ते वॉर्सा भागातल्या भारतीयांची भेट घेतील. २३ ऑगस्टला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्या निमंत्रणावरुन ते युक्रेन भेटीवर रवाना होतील. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी उच्चस्तरीय चर्चा होईल. रशिया -युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण उपाय सुचवण्यासाठी भारत आवश्यक ते योगदान आणि शक्य तेवढा पाठिंबा देईल, असंही लाल यांनी सांगितलं.
Site Admin | August 20, 2024 1:16 PM | PM Narendra Modi