डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. पुण्यातल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो सेवेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर २ हजार ९५५ कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो स्वारगेट- कात्रज विस्ताराची पायाभरणीही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाली. पुण्यातल्या भिडेवाडा इथल्या सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मारकाचं भूमिपूजनही मोदी यांनी केलं. तसंच, राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत बिडकीन औद्योगिक क्षेत्राचं लोकार्पणही मोदींच्या हस्ते आज झालं. यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोलापूर विमानतळाचे उद्घाटनदेखील झालं. पुणे ही महान विभूतींची प्रेरणाभूमी असून महाराष्ट्राच्या विकासाच्या नव्या अध्यायाची साक्षीदार बनली आहे, असं प्रधानमंत्री याप्रसंगी म्हणाले. 

 

महाराष्ट्राला क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दिलेला वारसा पुढे नेणारा हा कार्यक्रम आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. अनेकांनी विरोध करूनही सावित्रीबाईंनी मुलींसाठी शाळा सुरू केली, यामुळे मुलींना शिक्षणाची दारं उघडी झाली. या शिक्षणाच्या वारशाची आठवण करून देणारं स्मारक भिडे वाड्यात केलं जात आहे, हे स्मारक पुढचे अनेक वर्षे प्रेरणा देत राहील, असं फडणवीस म्हणाले. 

 

देशाचा सर्वांगीण विकास करणं आणि सर्व घटकांचे प्रश्न सोडवणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं उद्दिष्ट आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. प्रधानमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांची उजळणी यावेळी पवार यांनी केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या बिडकीन इथं ५२ हजार कोटींचे प्रकल्प येत आहेत. त्यातून युवांच्या हाताला रोजगार मिळणार आहेत, याचं सर्वांना समाधान आहे असं पवार म्हणाले. फुले दाम्पत्याच्या स्मारकासाठी ज्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत त्यांना योग्य मोबदला दिला जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा