नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी हे देशातल्या नागरिकांसाठी राज्यघटनेत अनुस्यूत असलेल्या आदर्शांची पूर्ती करण्याच्या दिशेनं टाकलेलं ठोस पाऊल आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज हरियाणात चंडीगढ इथं नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचं लोकार्पण केल्यानंतर बोलत होते. नवे फौजदारी कायदे वसाहतवादाच्या मानसिक गुलामगिरीतून भारतीयांना मुक्त करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी निमित्त त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं. या कार्यात योगदान देणाऱ्या सर्व व्यक्ति आणि संस्थांचे त्यांनी आभार मानले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ही यावेळी उपस्थित होते. येत्या तीन वर्षात हे तीन नवे कायदे संपूर्ण देशात लागू केले जातील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
त्यापूर्वी मोदी आणि शाह यांनी नव्या फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीतील प्रगतीबद्दलचं सादरीकरण पाहिलं. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम या तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीला यावर्षी १ जुलैपासून सुरूवात करण्यात आली.