भारत आणि मॉरिशसदरम्यान सागरी सुरक्षा आणि स्थानिक चलनात व्यापारवृद्धीसह आठ महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलम यांच्यात पोर्ट लुईसमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दरम्यान, मॉरिशसच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्र्याचं आज सकाळी नवी दिल्लीत आगमन झालं आहे.
काल झालेल्या चर्चेनंतर प्रधानमंत्री मोदी यांनी विकसनशील देशांबाबत विविध विभागांमध्ये सुरक्षा आणि विकासासाठी सहमतीनं आणि सर्वसमावेशक प्रगती म्हणजे महासागर या भारताच्या नवीन धोरणाची घोषणा केली. मॉरिशस आणि भारताची समान उद्दिष्टे लक्षात घेऊन भारत मॉरिशसला संरक्षण आणि सुरक्षाविषयक मदत सुरूच ठेवेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. काल, प्रधानमंत्री मोदी मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन समारंभात सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या समारंभात मोदी यांना ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा सन्मान मॉरिशसचे अध्यक्ष धरमवीर गोकुल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मॉरिशसचा हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे मोदी हे पहिलेच भारतीय आहेत.