दहशतवादाविरोधातल्या लढ्यात देशातली एकी हीच सर्वात मोठी ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून सांगितलं. हा या कार्यक्रमाचा एकशे एकविसावा भाग होता.
सुरुवातीलाच प्रधानमंत्र्यांनी पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेनं आपलं मन व्यथित झाल्याची भावना व्यक्त केली. या हल्ल्यामुळे देशातला प्रत्येक नागरिक दुःखी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना, शाळा-महाविद्यालयांमध्ये चैतन्य निर्माण होत असताना आणि पर्यटकांची संख्या वाढत असताना दहशतवाद्यांनी काश्मीरला उद्ध्वस्त करण्याच्या हेतूनं हा कट रचल्याचं ते म्हणाले. या आव्हानाचा सामना करण्यासाठी आपले संकल्प अधिक बळकट करावे लागतील आणि एक राष्ट्र म्हणून प्रबळ इच्छाशक्ती दाखवून द्यावी लागेल, असं ते म्हणाले. जगभरातल्या देशांच्या नेत्यांनी या कठीण काळात भारतासोबत असल्याचा संदेश दिल्याचंही त्यांनी नमूद केलं. या हल्ल्यातल्या पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आणि दोषींना कठोर प्रत्युत्तर देण्याचा निर्धारही त्यांनी आजच्या ‘मन की बात’मधून व्यक्त केला.
ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. के. कस्तुरीरंगन यांचं नुकतंच निधन झाल्याचा उल्लेख करुन प्रधानमंत्र्यांनी विज्ञान, शिक्षण आणि भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या त्यांच्या कार्याला उजाळा दिला. युवकांची प्रतिभा, शिक्षण आणि अंतराळ विज्ञानाशी संबंधित त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा अनुभव त्यांनी श्रोत्यांसमोर मांडला. त्यांच्यामुळेच इस्रोला नवी ओळख मिळाली तसंच भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला जागतिक मान्यता मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. विज्ञान, शिक्षण आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाला नव्या उंचीवर नेण्यात त्यांनी दिलेलं योगदान कायमच स्मरणात राहील अशी भावना त्यानी व्यक्त केली.
यानिमित्तानं प्रधानमंत्र्यांनी इस्त्रोची कामगिरीही श्रोत्यांसमोर माडंली. एप्रिल महिन्यात आर्यभट्ट उपग्रहाच्या प्रक्षेपणाला ५० वर्षं पूर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. ५० वर्षांपूर्वी मर्यादित संसाधनं असूनही भारतीय शास्त्रज्ञांनी आपली प्रतिभा, समर्पण वृत्ती आणि राष्ट्रसेवेच्या भावनेतून या क्षेत्रातली भारताची आजवरची वाटचाल घडवून आणली असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. आज भारत सर्वात किफायतशीर आणि यशस्वी अंतराळ कार्यक्रमांच नेतृत्व करत आहे, आणि जगभरातले अनेक देश त्यांच्या अंतराळ मोहिमांसाठी भारताची मदत घेत असल्याचं त्यांनी सांगितलं.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी इस्रोच्या उपग्रह प्रक्षेपणांबद्दलचा आपला वैयक्तिक अनुभवही श्रोत्यांसमोर मांडला. अंतराळ क्षेत्रात खाजगी संस्था आणि स्टार्टअप परिसंस्थेत झालेल्या प्रगतिविषयी त्यांनी सांगितलं. आज देशात सव्वा तीनशेहून अधिक अंतराळविषयक स्टार्टअप्स कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. आगामी काळ अंतराळ क्षेत्रातील अनेक नव्या संधींचा आणि यशाची शिखरं गाठण्याचा असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वसुधैव कुटुंबकम् हीच आपली परंपरा आणि संस्कार असल्याचं सांगत प्रधानमंत्र्यांनी भारतातर्फे इतर देशांमधे करण्यात येणाऱ्या मानवतावादी विश्व मित्र म्हणून भारत दाखवत असलेली तत्परता आणि मानवतेप्रती भारताची वचनबद्धताही प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमधून अधोरेखित केली. अलिकडेच म्यानमारमध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर भारतानं ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत म्यानमारमध्ये केलेल्या मदत आणि बचाव कार्याची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. या अभियानाअंतर्गत भारताच्या पथकानं तिथं फील्ड हॉस्पिटल उभारलं, अभियंत्यांच्या पथकानं महत्त्वाच्या इमारती आणि पायाभूत सुविधांच्या नुकसानीच्या मूल्यांकनात मदत केली, तर मदत करणाऱ्या पथकानं गरजुंना आवश्यक साहित्य पुरवल्याची माहिती त्यांनी दिली. भारतीय बचाव पथकामुळे अनेकांना नवं जीवन मिळाल्याची तिथल्या लोकांनी व्यक्त केलेली भावनाही प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांसोबत सामायिक केली.
अफगाणिस्तान तसंच युथोपियाला भारताच्या वतीनं केल्या जात असलेल्या वैद्यकीय मदतीबद्दलही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. या निमित्तानं प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं तयार केलेल्या सचेत या मोबाईल ॲपविषयी देखील माहिती दिली. या ॲपच्या माध्यमातून पूर, चक्रीवादळ, भूस्खलन, त्सूनामी, वणवे, हिमस्खलन, वादळ, वीज कोसळणं या आणि अशा नैसर्गिक आपत्तींविषयीची माहिती उपलब्ध होईल तसंच संकटाच्या काळात सुरक्षित राहण्यास मदत होईल असं त्यांनी सांगितलं. श्रोत्यांनी या ॲपचा वापर करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
आज भारताचा युवा वर्ग विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाकडे वाटचाल करत असल्याचं ते म्हणाले. देशाच्या विविध भागातील युवा वर्गानं तंत्रज्ञानाचा वापर करत तयार केलेल्या उपकरणांविषयीची माहिती त्यांनी दिली. यासोबतच देशाच्या विविध भागातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रतिकूल हवामानात विविध पिकं घेण्यासंबंधी केलेल्या अभिनव प्रयोगांची माहिती त्यांनी आजच्या मन की बातमधून दिली.
१०८ वर्षांपूर्वी १८५७ च्या एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचं स्मरण त्यांनी श्रोत्यांना करून दिलं. यानिमित्तानं महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात चंपारण इथं झालेल्या सत्याग्रहाची आणि या सत्याग्रहातूनच भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा उदय झाल्याची गाथा त्यांनी श्रोत्यांना सांगितली. येत्या १० मे ला या पहिल्या स्वांतंत्र्य संग्रामाच्या स्मृती दिनानिमीत्त आपण स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रेरणा जिवंत ठेवाव्यात असं आवाहन त्यांनी श्रोत्यांना केलं.
आपले १४० कोटी नागरिक, त्यांचं सामर्थ्य, त्यांची इच्छाशक्ती हे आपल्या देशाचं सर्वात मोठं बळ आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले. लवकरच येत्या ५ जूनला एक वर्ष पूर्ण होणार असलेल्या, एक पेड मां के नाम या वृक्ष लागवड मोहिमेला मिळालेलं यश हे त्याचंच द्योतक असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या नागरिकांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं. पृथ्वीचं आरोग्य सांभाळण्यासाठी, हवामानबदलाच्या आव्हानावर मात करण्यासाठी आणि आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचं आवाहन त्यांनी केलं.