संविधान सभेत झालेल्या चर्चा, सदस्यांनी मांडलेले विचार, हा आपला सर्वात मोठा वारसा असून संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा, असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलं.
भारताच्या प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन, तसंच भारतीय संविधान लागू झाल्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्यानिमीत्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी संविधान सभेत मांडलेल्या विचारांचं ध्वनिमुद्रण प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांना ऐकवलं. येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन असल्याचं स्मरणही त्यांनी श्रोत्यांना करून दिलं. संविधानात निवडणूक आयोगाला आणि लोकशाहीमध्ये लोकांच्या सहभागाला खूप महत्त्वाचं स्थान दिलं आहे, आणि गेल्या दशकभरात देशाची लोकशाही अधिक मजबूत आणि समृद्ध झाली आहे, असं ते म्हणाले. निवडणूक आयोगानं तंत्रज्ञानाचा वापर करत, लोकशाहीला बळ दिलं आहे, असं म्हणत नागरिकांनी वेळोवेळी आपला मताधिकार बजावत लोकशाही प्रक्रियेचा भाग व्हावं आणि त्याला बळ द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.
उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरू असलेला महाकुंभमेळा म्हणजे एकतेचं दर्शन घडवणारा महाकुंभ आहे, असं ते म्हणाले. यंदाच्या कुंभमेळ्यात युवा वर्गाचा मोठा सहभाग असल्याचा उल्लेख करुन त्यांनी समाधान व्यक्त केलं. देशाच्या विविध भागातले उत्सव- परंपरा आणि कुंभमेळा यांचा संबंध त्यांनी स्पष्ट केला. हा कुंभमेळा डिजीटल माध्यमांतून जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरत असून त्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे असं ते म्हणाले,
भारतानं अंतराळ क्षेत्रात केलेल्या ऐतिहासिक कामगिरीविषयी त्यांनी श्रोत्यांना महिती दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं अंतराळात दोन उपग्रहांना परस्परांसोबत जोडण्याचा प्रयोग नुकतंच यशस्वी करून दाखवल्याचा उल्लेख प्रधानमंत्र्यांनी केला. भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्ट-अप कंपनीनं देशातला पहिला खाजगी उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्याची माहिती त्यांनी दिली.
या यशामुळे भारतानं आधुनिक अंतराळ तंत्रज्ञानात आघाडी घेतली असून, भारताच्या या कामगिरीतून आपले शास्त्रज्ञ आणि नवोन्मेषक किती दूरदर्शी आहेत याचीच साक्ष मिळते, असं ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच स्टार्टअप इंडिया योजनेला ९ वर्ष पूर्ण झाल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी करून दिलं. या काळात देशात निर्माण झालेले अर्ध्यापेक्षा जास्त स्टार्टअप्स टियर २ आणि टियर ३ शहरांमधले आहेत, यातून आपली स्टार्टअप संस्कृती केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही हेच दिसून येतं, असं ते म्हणाले. याबाबतीतलं उदाहरण मांडतांना त्यांनी महाराष्ट्रातल्या वाशीम शहराचाही उल्लेख केला. छोट्या शहरांमधले अर्ध्यापेक्षा जास्त स्टार्टअप्स मुली चालवतात असल्याचंही त्यांनी कौतुकाने सांगितलं.
येत्या २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीदिनी आपण पराक्रम दिवस साजरा करणार असल्याची आठवण त्यांनी श्रोत्यांना करुन दिली. सुभाषचंद्र बोस यांच्या कार्याला उजाळा देतानाच बोस यांच्या घराला भेट दिल्याचा अनुभव त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. देशात वन्यजीवांच्या संवर्धन आणि सहकार्यासाठी होत असलेल्या, तसंच महिला बचत गटांच्या प्रेरणादायी यशोगाथाही प्रधानंत्र्यांनी आजच्या ‘मन की बात’ मधून श्रोत्यांना ऐकवल्या.