राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी आता एक आठवडाच शिल्लक असल्यानं सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेते झंझावाती दौरे करुन आपापल्या पक्षाच्या किंवा आघाडीच्या उमेदवारांना मत देण्याचं आवाहन मतदारांना करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये प्रचारसभा घेत आहेत.
महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रात सर्वात जास्त परकीय गुंतवणूक झाली असून विमानतळ, महामार्ग, डिजिटल कनेक्टिव्हीटी, सिंचन, लोहमार्ग, वंदे भारत ट्रेन असा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, असं प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमुर मतदारसंघात आयोजित प्रचारसभेला संबोधित करत होते. महायुती राज्यात सत्तेत आल्यावर विकासाचा वेग दुप्पट होणार असल्याचंही मोदी म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या संकल्पपत्रात सर्व घटकांचा विचार केल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
महायुती सरकारच्या काळात चिमुर, गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांना आळा घालण्यात आला. नक्षलवादाला आटोक्यात ठेवायचं असेल तर पुन्हा एकदा महायुतीला निवडून देण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं. महायुती सरकारनं कोट्यवधी लोकांना घर, आरोग्य सुविधांचा लाभ दिला, २५ कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर काढलं, सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिलं, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. राज्यात पुन्हा एकदा सत्ता आल्यास सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ६ हजार रुपये हमीभाव दिला जाईल, असं आश्वासनही त्यानी यावेळी दिलं. यावेळी राज्याचे वन आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, रामदास तडस, महायुतीचे उमेदवार नेते उपस्थित होते.