राज्यात गेल्या काही वर्षात विकासाचे अनेक प्रकल्प सुरू झाले आणि त्यातले अनेक पूर्ण झाले आहेत, यापूर्वी एवढा वेगवान विकास महाराष्ट्राने पाहिलेला नाही, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. राज्यातल्या सुमारे सात हजार सहाशे कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीने केली त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा हे मराठी माणसाचं स्वप्न नुकतंच केंद्रसरकारच्या निर्णयामुळे साकार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.
राज्यातल्या दहा वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. ही महाविद्यालयं मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली इथं सुरू होणार आहेत. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा ९०० ने वाढणार असून, एकूण ३५ महाविद्यालयात मिळून दरवर्षी चार हजार ८५० जागा उपलब्ध होणार आहेत.
नागपूरच्या नवीन डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळाचं आणि शिर्डीच्या नवीन एकात्मिक विमानतळ टर्मिनलचं भूमीपूजन तसंच भारतीय कौशल्य संस्था आणि विद्या समीक्षा केंद्राचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं.
दूरदृष्यप्रणालीमार्फत झालेल्या या कार्यक्रमात विविध ठिकाणाहून विविध मान्यवर सहभागी झाले होते. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन मुंबईतून तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथून कार्यक्रमात भाग घेतला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस नागपूर इथून कार्यक्रमात सहभागी झाले. शिर्डी विमानतळावरच्या कार्यक्रमाला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी तसंच विमानतळ प्राधिकरणाचे आणि इतर वरिष्ठ प्रशासकीय उपस्थित होते. या विमानतळाचं नामकरण साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असं झाल्याचं मंत्री विखे पाटील यांनी यावेळी जाहीर केलं.