प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कमधे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७९ व्या सत्रादरम्यान नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली, कुवेतचे राजपुत्र शेख सबाह खालेद अल हम अल सबाह आणि पॅलेस्टिनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्याशी स्वतंत्रपणे विविध विषयांवर चर्चा केली.
मोदी आणि ओली यांनी भारत आणि नेपाळ यांच्यातल्या दृढ संबंधांचा आढावा घेतला आणि विकास भागीदारी, जलऊर्जा सहकार्य, जनसंपर्क अशा अनेक क्षेत्रातल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं.
मोदी आणि सबाह यांची ही पहिलीच भेट. कुवेत आणि भारताच्या ऐतिहासिक संबंधांना या दोघांनी उजाळा दिला. दोन देश एकमेकांना ऊर्जा आणि अन्न सुरक्षा गरजा या क्षेत्रात सहकार्य करत असल्याची नोंद त्यांनी घेतली. कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या हिताची ग्वाही दिल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे आभार मानले.
गाझामधे ढासळत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीबद्दल मोदी यांनी अब्बास यांच्या समोर चिंता व्यक्त केली आणि पॅलेस्टिनी जनतेला आपला पाठिंबा दर्शवला.