भारतीय अर्थव्यवस्थेत सुमारे १६० अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीसह सिंगापूर हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ब्रुनेईचा यशस्वी दौरा आटोपल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल सिंगापूर इथं पोहोचले. त्यानंतर मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वोंग यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर भारत आणि सिंगापूर दरम्यान आरोग्य आणि औषध, शिक्षण आणि कौशल्य विकास, डिजिटल तंत्रज्ञान आणि भारत-सिंगापूर सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारी या क्षेत्रातील सहकार्यासाठी चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानंतर मोदी बोलत होते. सिंगापूर हा केवळ भागीदार देशच नाही तर प्रत्येक विकसनशील राष्ट्रासाठी प्रेरणास्थान आहे, असं मोदी यांनी सांगितलं. त्यानंतर दोन्ही प्रधानमंत्र्यांनी सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील अग्रगण्य सिंगापूर कंपनी AEM होल्डिंग्स लिमिटेडलाही भेट दिली. प्रधानमंत्री मोदी आज सिंगापूरचे राष्ट्रपती थर्मन षणमुगरत्नम आणि इतर अनेक मान्यवरांचीही भेट घेणार आहेत. ते सिंगापूरच्या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत.
Site Admin | September 5, 2024 1:22 PM | PM Narendra Modi | Singaporean counterpart Lawrence Wong