प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कालपासून कुवेतच्या दौऱ्यावर आहेत. कुवेतच्या बायन पॅलेसमध्ये औपचारिक स्वागतानंतर प्रधानमंत्री आज कुवेतचे अमीर आणि राजपुत्र यांच्याशी स्वतंत्र बैठका घेणार आहेत. कुवेतच्या प्रधानमंत्र्यांशी ते शिष्टमंडळ स्तरावरही चर्चा करतील. गेल्या ४३ वर्षांतील भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरून त्यांचा हा दौरा होत आहे.
काल प्रधानमंत्र्यांनी कुवेतमध्ये ‘हाला मोदी’ या विशेष कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या मेळाव्याला संबोधित केलं. कुवेतच्या विकासात आणि भारत-कुवेत संबंध मजबूत करण्यात भारतीयांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी म्हटलं. पुढील महिन्यात आयोजित प्रवासी भारतीय दिवस आणि महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याचं आमंत्रण त्यांनी भारतीय समुदायाला दिलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी कुवेतमधल्या मिना अब्दुल्लैश भागातल्या कामगार शिबिराला भेट देऊन गेल्या दहा वर्षांत भारत सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांबाबत भारतीय कामगारांशी चर्चा केली. या शिबिरात भारतातल्या विविध राज्यातले सुमारे दीड हजार कामगार आहेत. प्रधानमंत्र्यानी १०१ वर्षीय भारतीय परराष्ट्र सेवेतले माजी अधिकारी मंगल सैन हांडा यांचीही भेट घेतली. कुवेतमध्ये २६व्या अरेबियन गल्फ कपच्या उद्घाटन सोहळ्यालाही प्रधानमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुवेतच्या नेत्यांशी अनौपचारिक चर्चाही केली.