डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 5, 2025 8:16 PM | PM Narendra Modi

printer

भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास

भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजधानी दिल्लीत रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित १२ हजार २०० कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं, त्यानिमत्तानं रोहिणी इथं झालेल्या कार्यक्रमला ते संबोधित करत होते. येत्या २५ वर्षांत भारत विकसित देश झालेला आपण पाहू असं सांगून, दिल्लीला या विकसित देशाची राजधानी म्हणून अधिक विकसित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

 

भारतातील मेट्रो रेल्वे सेवेचे जाळे आता एक हजार किलोमीटरपर्यंत विस्तारले असून, भारत सर्वात मोठे मेट्रो रेल्वे सेवा जाळे असलेला जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या काळात याबाबतीत आपण भारतातला दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

गेल्या दशकभरात केंद्र सरकारनं पायाभूत सोयी सुविधांच्या विकासावर, तसंच शहरांमध्ये आणि एका शहराला इतर शहरांशी जोडण्यावर भर दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. यादृष्टीने पायाभूत सुविधांसाठी नियोजित आर्थिक तरतूद ११ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त केली असं ते म्हणाले. 

 

गरिबातील गरीब लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर सरकारनं भर दिला आहे. सरकार आयुष आणि आयुर्वेद यांसारख्या पारंपारिक भारतीय औषध पद्धतींनाही प्रोत्साहन देत असून, गेल्या दशकभरात आयुष प्रणाली १०० पेक्षा जास्त देशांमध्ये विस्तारली. भारतात जगाची आरोग्य आणि निरामयता राजधानी बनण्याची प्रचंड  क्षमता असून, आता जग मेक इन इंडिया सोबतच जग ‘हील इन इंडिया’ या मंत्राचाही स्वीकार करेल असं  म्हणाले. 

 

या कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी  गाजियाबाद जिल्ह्यातल्या साहिबाबाद रेल्वे स्‍थानक ते दिल्लीतील न्यू अशोकनगर रेल्वेस्‍थानकादरम्यान नमो भारत रेल्वेनं प्रवासही केला. प्रवासादरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या चिमुकल्यांनी प्रधानमंत्र्यांना कविता म्हणून दाखवल्या तसंच स्वतः काढलेली चित्रं भेट दिली. त्यानंतर त्यांनी विविध योजना आणि प्रकल्पांचं उद्घाटन,लोकार्पण आणि पायाभरणी केली. 

 

साहिबाबाद ते न्यू अशोक नगर दरम्यान दिल्ली-गाझियाबाद – मेरठ नमो भारत कॉरिडॉरच्या १३ किलोमीटर लांबीच्या विस्तारीत मार्गाचं उद्घाटन करून त्यांनी दिल्लीला पहिल्या नमो भारत रेल्वे गाडीची भेट दिली. दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या विठाला कुंडली क्षेत्राची पायाभरणी त्यांच्या हस्ते झाली. दिल्लीतील रोहिणी इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नवीन अत्याधुनिक इमारतीच्या कामाचं  भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झालं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा