भारत टेक्स प्रदर्शनातून भारतीय संस्कृती आणि विकसित भारताच्या भविष्याचं चित्र दिसत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम् इथं आयोजित भारत टेक्स २०२५ मध्ये बोलत होते. भारत टेक्स आता जागतिक पातळीवरचा महोत्सव झाला असून हे प्रदर्शन जगभरातल्या कापड उद्योजकांसाठी एक चांगलं व्यासपीठ बनलं आहे. वेगवेगळ्या देशांची कापड संस्कृतीविषयीच्या माहितीची देवाणघेवाण या प्रदर्शनाच्या निमित्ताने होत आहे, असंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.
गेल्यावर्षी आपण कापड उद्योगात फार्म, फायबर, फॅब्रिक, फॅशन आणि फॉरेन या पाच घटकांविषयी बोललो होतो. हे धोरण आता भारतासाठी महत्त्वपूर्ण धोरण झालं आहे. या धोरणातून शेतकऱ्यांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत प्रगतीच्या नव्या वाटा मिळत आहेत. आपण जगातले सर्वात मोठा कापड निर्यातदार देश आहोत. आपण तीन लाख कोटींपर्यंत ही निर्यात झाली असून २०३० पर्यंत हीच रक्कम ९ लाख कोटींवर घेऊन जाणं हेच आपलं लक्ष्य आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
भारत टेक्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं भव्य वस्त्रोद्योग प्रदर्शन असून ते उद्यापर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये कच्च्या मालापासून ते तयार उत्पादनांपर्यंत विविध उत्पादनं आणि यंत्रसामुग्रीचा समावेश आहे. प्रदर्शनाबरोबरच विविध चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रमही घेतले जात आहेत. नवोन्मेष उपक्रम आणि स्टार्ट अप दालन तसंच हॅकेथॉनवर आधारित स्टार्टअप पिच फेस्ट आणि निधी योजना असे कार्यक्रम, तसंच डिझाइन स्पर्धाही घेण्यात येत आहेत . ५ हजार हून अधिक प्रदर्शक, १२० हून अधिक देशांतील ६००० आंतरराष्ट्रीय खरेदीदार आणि इतर विविध अभ्यागत या प्रदर्शनात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.