जागतिक स्तरावर चांगल्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा देणारी आरोग्याची राजधानी होण्याची क्षमता भारताकडे आहे, मेक इन इंडियाच्या धर्तीवर, जग लवकरच हील इन इंडिया हा मंत्र स्वीकारेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. दिल्लीत, केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नव्या इमारतीची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते काल दूरस्थ पद्धतीने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केलं असून, आयुष आणि आयुर्वेद यांच्या माध्यमातून पारंपरिक भारतीय उपचारपद्धतीला प्रोत्साहन देत असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं. आयुष प्रणाली १०० हून अधिक देशांमध्ये पोहचली असून, जागतिक आरोग्य संघटनेची, पारंपरिक उपचारपद्धतीशी निगडीत पहिली संस्था भारतात स्थापन होत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय आयुर्वेद संस्थेचा परिसर तीन एकर क्षेत्रावर विकसित होत असून त्यावर १८५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पारंपरिक उपचारपद्धती आणि नाविन्याचा मेळ असलेली सर्वांगीण उपचारपद्धती तिथं उपलब्ध होणार आहे.
Site Admin | January 6, 2025 12:43 PM | Ayurveda | PM Narendra Modi