भारत आणि जर्मनीचे संबंध प्रत्येक पातळीवर दृढ होत असून पुढच्या २५ वर्षात हे संबंध नवी उंची गाठतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. १८ व्या आशियाई पॅसिफिक परिषदेलाही ते संबोधित करत होते. भारत हे वैविध्य आणि सुरक्षिततेचं केंद्र बनत असून भारत आणि जर्मनी यांच्यातले संबंध जगाच्या भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले. जगाला स्थिरता, विश्वास आणि पारदर्शकतेची गरज आहे, समाज आणि पुरवठा साखळीमध्येही या मूल्यांची अत्यंत आवश्यकता आहे, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, भारत आणि जर्मनी यांच्यात आज सातवी आंतरसरकारी पातळीवरील बैठक होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ शोल्झ या बैठकीचं संयुक्त अध्यक्षपद भूषवतील. तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी त्यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं आहे. या बैठकीत दोन्ही देशांचे मंत्री आपापल्या कार्यक्षेत्राविषयी चर्चा करतील आणि त्याचा अहवाल प्रधानमंत्री आणि चॅन्सलर यांना देतील. हरित संक्रमण, स्थलांतर, तंत्रज्ञान या घटकांवर लक्ष केंद्रित करणं हे याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर दोन्ही नेतेे सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य, पर्यावरण सहकार्य आदी मुद्यांवर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.