गेल्या दहावर्षात भारतानं आपली अर्थव्यवस्था दुपटीनं वाढवली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज तमीळनाडूत रामेश्वरम इथं समुद्रावरच्या उघडता येणाऱ्या पंबन रेल्वे पुलाच्या उद्घाटनासह विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर आयोजित सभेला संबोधित करताना ते बोलत होते. गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारनं पायाभूत सुविधांसाठीची अर्थसंकल्पीय तरतुद सहा पटीनं वाढवल्याचं त्यांनी सांगितलं. देशात पायाभूत सुविधांचं वेगानं काम होत असल्याचं ते म्हणाले, यावेळी त्यांनी उपस्थितांसमोर मुंबईतील अटल सेतूसह देशभरात उभारलेल्या पुलांची उदाहरणं मांडली.
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज उद्धाटन झालेल्या पंबन रेल्वे पुलाच्या उभारणीसाठी साडेपाचशे कोटी रुपयांचा खर्च आला असून, सांध्याचं जोडणीतंत्र वापरून हा पुल उभारला आहे.
या नवा रेल्वेपुलामुळे रामेश्वरमची चेन्नईसोबतची दळणवळणीय जोडणी सुधारेल, आणि प्रवासी आणि मालवाहतूकीसह पर्यटन क्षेत्रालाही लाभ होईल असं ते म्हणाले.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी या पुलाखालून जाणाऱ्या पहिल्या जहाजाला, तसेच या पुलावरून जाणाऱ्या रामेश्वरम तांबरम एक्सप्रेसला देखील हिरवा झेंडा दाखवला. यानंतर प्रधानमंत्री रामेश्वरममधे एका रोड शोमध्ये सहभागी झाले. त्यांनी रामनवमीच्या निमित्तानं रामेश्वरम मंदिरात जाऊन दर्शनही घेतील.
यानंतर रामेश्वरम इथं आयोजित सभेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते तमीळनाडूमधील ८ हजार ३०० कोटी रुपयांच्या रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण देखील झालं.