भारत हा उदासीन नाही, तर शांततेसाठी ठामपणे वचनबद्ध आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. एआय संशोधक आणि पॉडकास्टर लेक्स फ्रिडमन यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
भारत ही गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींची भूमी आहे, त्यामुळे भारत जेव्हा शांततेविषयी बोलतो तेव्हा जग ऐकतं, भारतीय नेहमी सद्भावना आणि शांततेसाठी ठाम भूमिका घेतात, असंही ते यावेळी म्हणाले. या मुलाखती दरम्यान मोदी यांनी यूक्रेन आणि रशिया संघर्षावरच्या प्रश्नालाही उत्तर दिलं. दोन्ही देश जेव्हा वाटाघाटी करण्याच्या भूमिकेत येतील तेव्हाच हा संघर्ष थांबेल, असं ते यावेळी म्हणाले.
मोदी यांनी यावेळी भारत आणि चीन संबंधांवरही आपली मतं मांडली. दोन्ही देशांमध्ये प्राचीन संस्कृतीच्या वारशाचा एक समान धागा आहे. दोन्ही देशांनी जगाच्या कल्याणात आपलं योगदान दिलं आहे. गेल्या काही शतकांमध्ये भारत आणि चीनमध्ये थेट संघर्षाचा कोणताही इतिहास नाही. शेजारी देशांमध्ये मतभेद होऊ शकतात पण त्यांचं रुपांतर युद्धात होऊ नये, यावर लक्ष केंद्रित करण्याची गरजही मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.
आपण जनतेची सेवा करायला राजकारणात आलो आहोत, आपल्याला सत्तेची लालसा नाही, असंही त्यांनी यादरम्यान स्पष्ट केलं. विश्वास हा आपल्या प्रशासनाचा पाया असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून जगातल्या एका सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा हिस्सा असल्याचा अभिमान देखील त्यांनी व्यक्त केला.