उत्तराखंडमध्ये वर्षभर पर्यटन सुरु राहावं, ऑफ सीझन होऊ नये त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. उत्तराखंडच्या हर्सिल इथं ट्रेक आणि बाइक रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर जाहीर सभेला ते संबोधित करत होते.
त्यापूर्वी प्रधानमंत्र्यांनी उत्तरकाशी जिल्ह्यात मुखवा इथं गंगा मंदिरात पूजा केली. वर्षभर पर्यटनाचं सरकारचं उद्दिष्ट तरुणांना रोजगार देईल असं सांगताना हिवाळ्यात उत्तराखंडला भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजूर केलेल्या सोनप्रयाग ते केदारनाथ आणि गोविंदघाट ते हेमकुंड साहिब या दोन रोपवे प्रकल्पांचा उल्लेख करताना यामुळे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांपर्यंत कमी होणार असल्याचं ते म्हणाले.
सीमावर्ती भागाला पर्यटनाचा लाभ मिळण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. काही दिवसांपूर्वी माणा इथं घडलेल्या दुर्दैवी घटनेबद्दल प्रधानमंत्र्यांनी दु:ख व्यक्त केलं. या कठीण परिस्थितीत देशानं पीडित कुटुंबांना बळ दिलं असं ते म्हणाले.