भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मध्यप्रदेशात भोपाळ इथं आज जागतिक गुंतवणूकदार परिषदेचं उद्धाटन त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारत ही सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असं जागतिक बँकेपासून सर्व महत्वाच्या संस्थाचं म्हणणं असल्याचं त्यांनी सांगितलं.
जगाला भारताबद्ल वाटणाऱ्या खात्रीमुळे देशाचा आत्मविश्वास वाढला आहे, विकसित भारतात वस्त्रोद्योग, पर्यटन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांना महत्व आलं आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. या तीनही क्षेत्रात सरकारनं परंपरिक कौशल्यावर भर देतानाच नवीन क्षेत्रानांही प्राधान्य दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्र्यांनी यावेळी मध्यप्रदेशच्या औद्योगिक धोरणाचंही उद्घाटन केलं. खनिज संसाधने आणि पायाभूत सुविधा असलेलं मध्यप्रदेश हे राज्य देशातल्या अग्रस्थानी असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे अशी प्रशंसा करत त्यांनी मध्यप्रदेशात गुंतवणूक करायला हा काळ सर्वोतम असल्याचं नमूद केलं.
भोपाळ इथं आजपासून सुरु झालेल्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत वैद्यकिय उपकरणे, कौशल्य वृद्धी, पर्यटन, MSME सह विविध विषयांवर चर्चासत्रं आणि विशेष सत्र होणार आहेत. प्रधानमंत्र्यानी काल मध्यप्रदेशातल्या बागेश्वर धाम वैद्यकीय आणि संशोधन संस्थेची पायाभरणी केली.