प्रयागराजच्या भूमीवर एक इतिहास रचला जात असून महाकुंभ मेळ्याच्या आयोजनामुळे देशाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख एका नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.
प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होणार असलेल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ७ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
भारत हा तीर्थक्षेत्रांचा आणि पवित्र नद्यांचा देश आहे. या नद्यांचं माहात्म्य, त्यांचा संगम म्हणजे प्रयाग आहे. प्रयोगराजचं वर्णन वेदांमध्ये केलं आहे, पावलोपावली पुण्यक्षेत्रं असलेलं हे एक आध्यात्मिक अनुभव क्षेत्र आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले. तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर विधीवत पूजा करून आणि दर्शन घेऊन केली.
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी झालेल्या प्रकल्पांमध्ये १० नवीन पूल, उड्डाणपूल, कायमस्वरूपी घाट आणि नदीसमोरच्या रस्त्यांचं बांधकाम या विकासकामांचा समावेश आहे. प्रयागराज आणि आजूबाजूच्या परिसरातला प्रवास यामुळे सुलभ होईल. प्रक्रिया न केलेलं सांडपाणी गंगेत वाहून जाण्यापासून रोखण्याच्या उद्देशानं एका प्रकल्पाचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते झालं.