तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परत यायला निघाले आहेत. गेल्या दशकभरात झालेला भारताचा प्रवास हा प्रमाण, गती आणि शाश्वततेचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी काल गयानामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना केलं. गयानात जॉर्जटाऊन इथल्या नॅशनल कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा पुनरुच्चार केला. भारतीय तरुणांनी देशाला जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था हा लौकिक प्राप्त करून दिला आहे. भारताचा विकास केवळ प्रेरणादायीच नव्हे तर समावेशक देखील आहे, असंही मोदी म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी काल गयानाच्या संसदेच्या विशेष अधिवेशनालाही संबोधित केलं. समावेशक समाजाच्या उभारणीसाठी लोकशाहीपेक्षा अन्य कोणतंही मोठं साधन नाही. पुढे जायचं असेल तर लोकशाही प्रथम आणि मानवता प्रथम हाच मंत्र आहे, लोकशाही भारतीयांच्या डीएनएमध्येच आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री मोदींनी काल जॉर्जटाऊन इथं गयानाचे अध्यक्ष इरफान अली यांच्यासमवेत वेस्ट इडिजच्या नामवंत क्रिकेटपटूंचीही भेट घेतली. नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या तीन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी परत यायला निघाले आहेत.
Site Admin | November 22, 2024 1:23 PM | PM Narendra Modi