भारतात मुबलक अन्नधान्य उपलब्ध असून, जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या 32 व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्या वेळी ते बोलत होते. यावर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना ‘शाश्वत कृषी-अन्न प्रणालीच्या दिशेनं परिवर्तन’ अशी आहे. सरकार कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी विविध सुधारणा आणि उपाययोजना करत असून, शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याचा व्यापक हेतू त्यामागे आहे. कृषिक्षेत्र भारत सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी आहे, असं ते म्हणाले. भारत भरडधान्य, तृणधान्यं आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. देशातील अन्नधान्य विविधता, जगासाठी आशेचा किरण असून जगापुढील अन्नसुरक्षेच्या समस्यांचं निराकरण भारत संपूर्ण क्षमतांनिशी करत आहे, असंही त्यांनी सांगितलं. परिषदेत 75 देशांचे एक हजारपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
Site Admin | August 4, 2024 10:09 AM | PM Modi