देशातल्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या कृषी विज्ञान केंद्रात अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या, आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ झाला. याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. या वाणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा विश्वासही त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. २७ फळपिकांसह इतर पिकं मिळून ६१ पिकांसाठी हे वाण विकसीत केले गेले आहेत. त्यात तृणधान्य, भरडधान्य, कडधान्य, तेलबिया, मसाले, ऊस, कपूस यांसह विविध पिकांचा समावेश आहे.
वाणांच्या वाटपाला प्रारंभ केल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी शेतकरी आणि कृषी वैज्ञानिकांशी संवाद साधला. ही नवी वाणं तयार केल्याबद्दल त्यांनी शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. नव्यानं विकसित होणाऱ्या वाणांच्या फायद्यांबद्दल कृषी विज्ञान केंद्रांनी शेतकऱ्यांना माहिती द्यावी, अशी सूचना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. लोक आता पोषक आहारावर भर देत असल्याचं सांगून भरड धान्याचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं.
शेतकऱ्यांनीही सरकारनं सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी उचललेली पावलं आणि याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांनी बजावलेल्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केलं.