जागतिक समस्यांवर स्थानिक उपाय शोधण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज, नवी दिल्ली इथं स्थापन केलेल्या अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनच्या, पहिल्या व्यवस्थापकीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं, त्यावेळी ते बोलत होते. संशोधन परिसंस्थेच्या मार्गातले अडथळे ओळखून ते दूर करण्यासाठी योग्य पावलं उचलायला हवीत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. संशोधनामध्ये सध्याच्या आव्हानांवर नवीन उपाय शोधण्यावर भर द्यायला हवा असं ते म्हणाले.
संस्थांचं श्रेणीकरण आणि मानकीकरणावर भर देत, विकासाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी विविध क्षेत्रातल्या तज्ञांची यादी आणि डॅशबोर्ड विकसित करायला हवा असं प्रधानमंत्री म्हणाले. संशोधन कार्यात साधन संपत्तीची कमतरता भासणार नाही, यावर वैज्ञानिक समुदायानं विश्वास ठेवायला हवा असं आवाहन त्यांनी केलं.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या शिफारसीनुसार अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात आली आहे. देशातली विद्यापीठं, महाविद्यालयं, संशोधन संस्था आणि संशोधन आणि विकास प्रयोगशाळांमध्ये संशोधन आणि नवोन्मेष संस्कृतीला चालना देणं, हे याचं उद्दिष्ट आहे. देशातल्या वैज्ञानिक संशोधनाला उच्च स्तरीय धोरणात्मक दिशा देणारी सर्वोच्च संस्था म्हणून ती काम करेल.