प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या श्रीलंका दौऱ्यात आज दोन्ही देशांमध्ये ऊर्जा, संरक्षण सहकार्य, डिजिटल तंत्रज्ञान, औषधनिर्माण, आरोग्य अशा एकूण सात महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सामंजस्य करार झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांच्यात प्रतिनिधिमंडळ स्तरावर चर्चा झाल्यांनतर केलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही नेत्यांनी आपली भूमिका मांडली.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना “श्रीलंका मित्र विभूषण” हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताच्या ‘शेजारी देशांना प्राधान्य’ धोरणात आणि व्हिजन महासागर संकल्पात श्रीलंकेला विशेष स्थान असल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी श्रीलंकेची वाटचाल प्रगतीपथाकडे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. भविष्यात दोन्ही देशांमधली भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. श्रीलंकेतल्या काही मंदिरांच्या निर्मितीसाठी भारत सहकार्य करेल, असं ते म्हणाले. भारताच्या सहकार्यानं श्रीलंकेत सुरु असलेल्या अनेक विकासकामांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं.
प्रधानमंत्र्यांनी श्रीलंकेतले विरोधी पक्ष नेते सजित प्रेमदासा आणि तमिळ पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली.